Saturday, July 27, 2019

'इन्सानियत अभी जिंदा हैं मेरे दोस्त!'

     'इन्सानियत अभी जिंदा हैं मेरे दोस्त!'

२६ जुलै २००५ हा दिवस प्रत्येक मुंबईकराला कायम लक्षात राहिल असा आहे. मुंबईसह सर्व उपनगरांत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 'अतिवृष्टी' हा शब्द मी तरी तेव्हा पहिल्यांदाच ऐकला आणि अनुभवलाही. भयंकर अनुभव होता तो. मी आणि माझं कुटुंब जरी त्यावेळी सुखरूप राहिलो असलो तरी हजारो लोकांना त्यावेळी मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. कित्येकांना मोठी वित्तहानी तर काहींना जीवितहानी सुद्धा सहन करावी लागली. त्यामुळे २००५ नंतर प्रत्येकच वर्षी तमाम मुंबईकरांची २६ जुलै या तारखेकडे सावध नजर असते. आणि त्यांची ही भीती थोड्याफार प्रमाणात का असेना पण खरी ठरते. दरवर्षी या तारखेला नेहमीपेक्षा थोडा जास्तच पाऊस पडतो. पण यावर्षी मात्र खऱ्या अर्थाने २००५ च्या घटनेची पुनरावृत्ती झाली असे म्हणायला वाव आहे. २२ - २३ तारखेपासूनच पावसाने जोर धरला होता. आणि बरोब्बर २६ जुलैला सकाळपासूनच त्याने त्याचे 'ते' रौद्ररूप धारण करायला सुरुवात केली.
      दुपारी ऑफिसला गेल्यापासून मी बातम्यांचे अपडेट घेत होतो. बाहेरची परिस्थिती बिघडत चालली आहे याची जाणीव होत होतीच. रात्री अकराच्या सुमारास काम आटपून ठाणे रेल्वे स्थानक गाठलं. रात्री ११:०९ ची बदलापूर फास्ट लोकल तशी वेळेवरच आली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे असं समजून निश्चिन्त झालो. दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गाडीला गर्दी सुद्धा नेहमीपेक्षा कमीच होती. त्यामुळे गाडीत चढल्याबरोबर उभं राहायला दोन सीटच्या मधली 'सेफ' जागा मिळाली.
       मी तर 'आजच्या दिवशी घरी जायला गाडी मिळाली' एवढ्यातच समाधान मानून होतो. पण थोड्याच वेळात हे समाधान चिंतेत परावर्तीत झाले. गाडीने फक्त ठाणे स्टेशन सोडलं आणि ती एकदम 'स्लो-मोशन'मध्ये गेली. रडत-खडत अर्धा तास प्रवास झाल्यानंतर गाडी दिव्याला पोहोचली. हळूहळू परिस्थिती लक्षात आली. लोकलमध्ये कोणत्या सूचना येत नव्हत्याच. मोबाईलवर येत असलेल्या अपडेट्सवरून आणि लोकांच्या कुजबुजण्यातून खात्री झाली, की कल्याणच्या पुढे गाड्या जातच नाहीत. आणि मग सगळ्यांची घालमेल सुरु झाली. आता घरी कसं पोहोचायचं? एवढ्या रात्री कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? यावर लोकांची आपापसांत चर्चा सुरु झाली. मी मात्र आपल्या स्वभावाप्रमाणे शांत उभा होतो.(याच स्वभावामुळे अनेकांना मी आकडू, खडूस, गर्विष्ठ वगैरे वाटतो.) डोंबिवलीला उतरण्यासाठी एकजण उठला, मला बसायला जागा मिळाली. मी बसलो, लोकांच्या चर्चा सुरुच होत्या. मी मोबाईलमध्ये डोकं घालून अपडेट्स बघत होतो. मी काहीच बोलत नाही हे बघून माझ्या शेजारच्या माणसाने स्वतःहून माझ्याशी बोलायला सुरुवात केली. वडिलधारा माणूस म्हणून मी सुद्धा बोलत राहिलो. त्यांना विठ्ठलवाडीला उतरायचं होतं आणि मला बदलापूरला.
       गाडीचा वेग जसजसा मंदावत चालला होता तसतशी इकडे लोकांची अस्वस्थता वाढत चालली होती. आपल्यापुढे गाड्यांची मोठी रांग लागली असणार हे सगळयांच्याच लक्षात आलं होतं. आतातर गाडी आपल्याला डोंबिवलीपर्यंत तरी पोहोचवते की नाही अशी शंका येऊ लागली. परंतु सुदैवाने कोपरनंतर गाडीने थोडा वेग घेतला. आता थोड्याच वेळात गाडी कल्याण स्थानकात पोहोचणारच होती, की तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेला माणूस उठला. रॅकवर ठेवलेली त्याची बॅग त्याने खाली घेतली आणि त्यातून बिस्किटांचा एक मोठा पुडा काढून माझ्यापुढे धरत म्हणाला, 'हे ठेवा जवळ'. मी आश्चर्याने त्या माणसाकडे बघितलं आणि 'नको' म्हणालो. तो पुन्हा म्हणाला, 'मला याची गरज नाही, मला विठ्ठलवाडीलाच जायचंय. कल्याणहून मी कसाही पोहोचेन घरी. पण तुम्हाला बदलापूरपर्यंत जाता येईल की नाही, जायला किती वाजतील याचा काही भरवसा नाही. कदाचित एखाद्या लॉजवर थांबावं लागलं तर हे (बिस्कीट) कामाला येईल. बाहेरचं काही तेलकट  खाण्यापेक्षा हे खा!' मी अनेकदा नकार दिल्यानंतरही त्या माणसाने तो बिस्कीटपुडा माझ्याकडे सोपवला आणि कल्याणला उतरून निघून गेला...
       कल्याणच्या पुढे गाडी जाणारच नव्हती, तशी उद्घोषणा प्लॅटफॉर्मवर सुरु झाली होती. मग मी पण गाडीतून उतरून ब्रिजच्या दिशेने चालत विचार करू लागलो, कोण होता हा माणूस? काय ओळख होती आपली? किती मिनिटं बोललो आम्ही एकमेकांशी? फार काही बोलणं झालंच नव्हतं आमच्यात आणि तरीसुद्धा या माणसाने माझा एवढा विचार करावा? मी ब्रिजवर पोहोचलो आणि अचानक मोबाईलला नेटवर्क मिळाल्यासारखं एकेक मित्रांचे फोन आणि मेसेजेस येऊ लागले. इतक्या रात्री म्हणजे साधारण दीडच्या सुमारास जवळ-जवळ २० - २५ मित्र-मैत्रिणींनी माझी विचारपूस केली. यातलं कोणीही मला नेहमी भेटत नाही, खरंतर आम्ही भेटतच नाही. तरीसुद्धा कोणी मला आपल्या घरी यायला सांगत होतं, कोणी बदलापूरला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करत होतं तर कोणी मला सोबत म्हणून माझ्याकडे यायला निघालं होतं. हे सगळेच काही मित्रही नव्हते, काही जण तर केवळ ओळखीचे होते.
मनात विचार आला, आपण आजकाल नेहमी म्हणतो, की माणसांमधली माणुसकी लोप पावत चालली आहे. पण मग इतक्या रात्री ही लोकं आपापल्या घरात सुखरूप असताना आणि बाहेर परिस्थिती एवढी वाईट असताना सुद्धा आपल्या मदतीसाठी इतकी तत्पर कशी ? अशा काही घटना घडल्या की माणसातल्या माणुसकीचं सुंदर दर्शन घडतं. शेवटी सर्वांची मदत नम्रपणे नाकारत आणि ज्ञात-अज्ञात अशा सर्व हितचिंतकांचे आभार मानत कल्याणमध्येच माझ्या एका भावाकडे मी जायला निघालो, मला न्यायला तो कल्याण स्टेशनला आला होता. पण जाता-जाता नकळतपणे स्वतःशीच पुटपुटलो, 'इन्सानियत अभी जिंदा हैं मेरे दोस्त!'